Monday, September 28, 2009

मरण

कुणी न काही कल्पिले कधी,
मृत्युत आहे एक अद्भुत शक्ती.

मरण हे सत्य अंतिम आहे ह्या जगती,
तरीही मरण का इतके हे मन हेलावती,
कोणाचाही मृत्यु असो का हळहळ वाटावी इतकी ती.

आयुष्यभराचा अबोला, वैर क्षणात उडूनी जाती,
धाय मोकलून मन रडू लागते एक जणू ते अपराधी,
दबलेली भावना मग आपली लागते मुक्त वाहू ती.

जन्मानंतर असतो जो फक्त काही मोजक्यांचा,
मृत्युनंतर होऊन जातो तोच साऱ्या जगाचा,
रंक असो वा राव असो होऊन जाई एक पातळी ती.

अनैसर्गिक घटना जितकी सुन्न करी माणसा तितकी ती,
परिपूर्ण काही कधीच नसते जाणारी ती ही व्यक्ती,
कळे न काही का फक्त तयाची सत्कार्येच ही आठवती,

खरा अर्थ कळतो कुठे जगण्याचा मानवाला
त्यामुळेच कदाचित वाटतो देवदूत मृत्यु तयाला,
देण्या तो सज्ज होई आतुरतेने मग ही आहुती.

लढता देशासाठी यावा मृत्यु यासम दुसरे भाग्य नसे,
वाटते अशावेळी आपुल्या जगण्याला काही अर्थ नव्हे,
क्षणात बलीदान तयांचे गाठते ऊंची ती किती.

आयुष्यभर गुणांची जयाच्या कदर कोणा नसे,
वणवण, कुचंबणा फक्त सोसली तयाने असे,
कवटाळताच मृत्युने कळते खरी तयाची ही महती.

मृत्युत सारे जणू मोक्ष एक ते शोधती,
वाटते मरण तयांना देवाच्या घरची पायरी ती,
अनंतात विलीन होण्या हसत मृत्युला ते कवटाळती.

कुणी न काही कल्पिले कधी,
मृत्युत आहे एक अद्भुत शक्ती.

....................................आशिष जोशी

चाकोरी-बाहेरचे जीवन

पहाटेचा मंद धुंद वारा,
प्राजक्ताचा पडला सडा,
पापण्यातील साखरझोप सारून तर बघा,
श्वास भरभरून तो सुवास घेऊन तर बघा.

श्रावणातली एक प्रसन्न सकाळ,
सभोवार पसरली दूरवर हिरवळ,
मस्त पडलेल्या धुक्यामध्ये जाऊन तर बघा,
अनवाणी पायाने दवबिंदूंवर चालून तर बघा.

उन्हाळ्यातल्या कडक दुपारी,
नभ अचानक येते भरूनी,
‘येरे येरे पावसा’ साद घालून तर बघा,
वळीवाच्या सरींत भिजत नाचून तर बघा.

हिवाळ्यातले शुभ्र चांदणे,
गुलाबी थंडीत लपेटलेले,
शेकोटीची उब अंगावर घेऊन तर बघा,
मित्रांसोबत रात्रभर गप्पा मारून तर बघा.

दिवसाची सुरुवात आगळी,
सुवर्णप्रभा नवतेज झळाळी,
न ठरविता ऑफिसला दांडी मारून तर बघा,
फक्त दोघं राजा-राणी मजा करून तर बघा.

सुट़्टीत विसावा संथ पहुडलेला,
घरी मुलांचा खेळ रंगलेला,
मुलांबरोबर साप-शिडी, लपा-छपी खेळून तर बघा,
चिमुकल्या नजरेतून ओसंडणारा आनंद साठवून तर बघा.

आयुष्यात दडले विलक्षण रंग,
मनात उठती असंख्य तरंग,
एकदातरी सगळ्यांचा आस्वाद घेऊन तर बघा,
थोडं चाकोरीबाहेर जाऊन मुक्त जगून तर बघा.

...............................आशिष जोशी

तपोवन

काल पहाटे स्वप्नात मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.

झाडी गर्द-हिरवी सभोवताली,
पाचूचे जणू वस्त्र ल्यायलेली,
अंधूक पायवाट आलो चालून एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.

मेघ सावळे आसमंती दाटलेले,
त्या ईश्वराने जणू छत्र धरलेले,
ओला गंध मातीचा आलो घेऊन एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.

पक्षांची हलकी ऐकली कूजबूज,
एकमेकांशी जणू चालले हितगूज,
केका मयुराचा आलो ऐकून एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.

वाऱ्याची मंद झुळुक येतसे,
मोरपिस जणू गालावर फिरतसे,
धुंद श्वास आलो घेऊन एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.

चोहीकडे अनेकविध रंग उधळले,
मोहक जणू इन्द्रधनू झळकले,
लाजऱ्या रानफुलाला आलो भेटून एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.

कालचे स्वप्न सत्यात आज आले,
रम्य तपोवनात आलो जाऊन एक मी.

............................आशिष जोशी

Tuesday, September 8, 2009

निसर्गाची किमया

गर्जत घन निळा बरसतो, विद्युल्लतेची साथ छेडीत,
क्षितीजावर इन्द्रधनू रंग उधळीत,
कोसळती शुभ्र प्रपात खाली,
हिरव्या गर्द कडा कपारी,
निसर्गाची ही किमया सारी.

अथांग दर्या दूर पसरतो, आभाळाला कवेत घेत,
अंगावर सोनेरी तरंग झेलीत,
खळखळती लाटा मध्यान्ह्काळी,
गडद निळ्या सागरकिनारी,
निसर्गाची ही किमया सारी.

ऊत्तुंग हिमालय उभा राहतो, आकाशाला हात टेकीत,
ऋषीतुल्य साधक जणू आशिष देत,
पसरती तयाची श्वेत सावली,
ऊंच सखोल दऱ्या गिरी-शिखरी,
निसर्गाची ही किमया सारी.

प्रखर रवि तेजात तळपतो, वसुंधरेचे रण पेटवीत,
चराचराचे जीवन उर्जीत,
उजळती दाही दिशा त्रिकाळी,
तप्त-तृप्त सहिष्णू धरा-अंबरी,
निसर्गाची ही किमया सारी.

..................आशिष जोशी

मुखवटा

मित्रांत हास्यविनोद-मस्करी चाललेली,
आत जिवाला घोर, काळजी लागलेली,
छानसा मुखवटा घालीत असतो,
आपणच स्वतःला फसवीत असतो.

वरवर आपुलकी, लोभ-जिव्हाळा,
अंतर्मनी द्वेष, उसना उमाळा,
सक्तीची नाती जपत असतो,
आपणच स्वतःला फसवीत असतो.

बाह्यरुपाचे स्तोम, उथळ विचार,
पोखरलेले आत मन, कुरुप विकार,
नुसतेच साज चढवीत असतो,
आपणच स्वतःला फसवीत असतो.

लोक-प्रतिष्ठा, वैभव श्रीमंती,
आत्मविवंचना, मन दरिद्री,
आयुष्यात सारखे पळत असतो,
आपणच स्वतःला फसवीत असतो.

......................आशिष जोशी

Unusual Mirror

Once I chanced upon an unusual mirror,
It showed a distinct me, much to my horror.

Neat and clean me of everyday appeared as sophisticated,
Eagerness to be on time seemed excessive and unwanted.

My efforts to dress well came across as obedience with uniformity,
Awareness on current events felt like an attempt to superiority.

Calm & quiet nature of mine appeared as private and snobbish,
Desire to pursue my dreams looked nothing but too selfish.

My beliefs in good old values looked as orthodox and outdated,
Cognizance of intricacies of human mind seemed unsupported.

Setting high performance standards seemed as unrealistic,
Passion for cars, good things in life felt as materialistic.

My insistence on self-reliance came out as being unsupportive,
Avoidance of a fight looked weak and counter-productive.

My urge to do the right thing read as rigid and unyielding,
Taste for good music & art appeared as dull and unexciting.

I scratched my brain but couldn’t find an answer to a thing,
After much thought it struck to me what was happening.

The mirror was showing what was others perception of me,
It was uncomfortable & embarrassing to see this new image of me.

What the mirror showed me was a complete revelation,
I must admit it forced me to have a deeper introspection.

……………………………………………………………………… Ashish Joshi

Monday, August 31, 2009

मिड-लाइफ क्राइसिस 
 
आयुष्याची वर्ष सरता-सरता वयाची चाळिशी गाठली जाते, 
डोक्यामध्ये निर-निराळ्या प्रश्नांचे थैमान, विचार-मंथन सुरू होते, 
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस|| 
  
आयुष्यात आपण काय कमावले, काय गमावले याची मोजदाद सुरू होते, 
कमवल्याच्या आनंदापेक्षा, गमावलेल्याची हूर-हूर वाटत राहते, 
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस|| 

भूतकाळातील घटनांचे संदर्भ बदलून गेल्याची जाणीव होते, 
आता अवतीभवती घडणार्‍या घटनांचे नवे संदर्भ जाणण्याची उर्मी जागी होते, 
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस|| 

शाळा-कॉलेज, लगेच मिळालेली नोकरी, पगारवाढ सगळे आठवत असते, 
त्याचबरोबर हेही लक्षात येते की, आपण फक्त नोकरीच केली, करियर करायचे राहून गेले, 
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस|| 

कामातील गती अचानक कमी झालेली वाटते, 
काहींना ही दगदग, धावपळ मुद्दाम कमी करावीशी वाटते, 
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस||  

आजवर करीत आलेल्या गोष्टीविषयी आत्मीयता संपत जाते, 
न केलेल्या गोष्टी करण्याविषयी सुप्त आसक्ती वाढत जाते, 
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस|| 

हेवे दावे, लोभ मत्सर, आपल-परक सगळ्या भावना धूसर होतात, 
जगण्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन, नव्या संवेदना प्रकट होत जातात, 
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस|| 

एकेकाळचे जिवलग मित्र, सवंगडी यांची सारखी आठवण होते, 
हेही कळते की, मधल्या काळात सख्ख्या जोडीदाराकडे दुर्लक्ष झाले होते, 
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस|| 

आपण मिळविलेले यश, कीर्ती यांचे महत्व गौण वाटू लागते, 
आता आपल्या मुलांनी खूप यश मिळवावे हीच उत्कट ईच्छा लागून राहते, 
यालाच आपण गोंडस नाव दिले आहे मिड-लाइफ क्राइसिस|| 

अशा ह्या नैसर्गिक वळणावर सगळेच येऊन धडपडत असतात, 
काय होईल, कस होईल ह्याचा विचार करत आपापली वाट शोधत असतात|| 

अशाच एका वळणावर येऊन मीही अडखळ लो आहे, 
माझ्या आयुष्याला निराळी दिशा देणारी वाट मला भेटेल का हे शोधतो आहे|| 

आयुष्यात असे महत्वाचे बदल आणणार्‍या वळणाला क्रायसिस हे नाव ठीक नसेल, 
परंतु आणखीन पुढे एक 'मिड-लाइफ' अजुन बाकी आहे हा दिलासा मात्रा नक्कीच सुखावेल|| 

......................................................................................आशिष जोशी