काल पहाटे स्वप्नात मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.
झाडी गर्द-हिरवी सभोवताली,
पाचूचे जणू वस्त्र ल्यायलेली,
अंधूक पायवाट आलो चालून एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.
मेघ सावळे आसमंती दाटलेले,
त्या ईश्वराने जणू छत्र धरलेले,
ओला गंध मातीचा आलो घेऊन एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.
पक्षांची हलकी ऐकली कूजबूज,
एकमेकांशी जणू चालले हितगूज,
केका मयुराचा आलो ऐकून एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.
वाऱ्याची मंद झुळुक येतसे,
मोरपिस जणू गालावर फिरतसे,
धुंद श्वास आलो घेऊन एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.
चोहीकडे अनेकविध रंग उधळले,
मोहक जणू इन्द्रधनू झळकले,
लाजऱ्या रानफुलाला आलो भेटून एक मी,
निसर्गवनात आलो जाऊन एक मी.
कालचे स्वप्न सत्यात आज आले,
रम्य तपोवनात आलो जाऊन एक मी.
............................आशिष जोशी
No comments:
Post a Comment