Tuesday, September 8, 2009

मुखवटा

मित्रांत हास्यविनोद-मस्करी चाललेली,
आत जिवाला घोर, काळजी लागलेली,
छानसा मुखवटा घालीत असतो,
आपणच स्वतःला फसवीत असतो.

वरवर आपुलकी, लोभ-जिव्हाळा,
अंतर्मनी द्वेष, उसना उमाळा,
सक्तीची नाती जपत असतो,
आपणच स्वतःला फसवीत असतो.

बाह्यरुपाचे स्तोम, उथळ विचार,
पोखरलेले आत मन, कुरुप विकार,
नुसतेच साज चढवीत असतो,
आपणच स्वतःला फसवीत असतो.

लोक-प्रतिष्ठा, वैभव श्रीमंती,
आत्मविवंचना, मन दरिद्री,
आयुष्यात सारखे पळत असतो,
आपणच स्वतःला फसवीत असतो.

......................आशिष जोशी

1 comment:

Arun Bhingarkar said...

Very good. I must say that the suggestions i made last time have been considered. Keep it up and we all look forward to more creativity from your side.

best regards,
Arun Bhingarkar