Monday, September 28, 2009

मरण

कुणी न काही कल्पिले कधी,
मृत्युत आहे एक अद्भुत शक्ती.

मरण हे सत्य अंतिम आहे ह्या जगती,
तरीही मरण का इतके हे मन हेलावती,
कोणाचाही मृत्यु असो का हळहळ वाटावी इतकी ती.

आयुष्यभराचा अबोला, वैर क्षणात उडूनी जाती,
धाय मोकलून मन रडू लागते एक जणू ते अपराधी,
दबलेली भावना मग आपली लागते मुक्त वाहू ती.

जन्मानंतर असतो जो फक्त काही मोजक्यांचा,
मृत्युनंतर होऊन जातो तोच साऱ्या जगाचा,
रंक असो वा राव असो होऊन जाई एक पातळी ती.

अनैसर्गिक घटना जितकी सुन्न करी माणसा तितकी ती,
परिपूर्ण काही कधीच नसते जाणारी ती ही व्यक्ती,
कळे न काही का फक्त तयाची सत्कार्येच ही आठवती,

खरा अर्थ कळतो कुठे जगण्याचा मानवाला
त्यामुळेच कदाचित वाटतो देवदूत मृत्यु तयाला,
देण्या तो सज्ज होई आतुरतेने मग ही आहुती.

लढता देशासाठी यावा मृत्यु यासम दुसरे भाग्य नसे,
वाटते अशावेळी आपुल्या जगण्याला काही अर्थ नव्हे,
क्षणात बलीदान तयांचे गाठते ऊंची ती किती.

आयुष्यभर गुणांची जयाच्या कदर कोणा नसे,
वणवण, कुचंबणा फक्त सोसली तयाने असे,
कवटाळताच मृत्युने कळते खरी तयाची ही महती.

मृत्युत सारे जणू मोक्ष एक ते शोधती,
वाटते मरण तयांना देवाच्या घरची पायरी ती,
अनंतात विलीन होण्या हसत मृत्युला ते कवटाळती.

कुणी न काही कल्पिले कधी,
मृत्युत आहे एक अद्भुत शक्ती.

....................................आशिष जोशी

No comments: