Tuesday, September 8, 2009

निसर्गाची किमया

गर्जत घन निळा बरसतो, विद्युल्लतेची साथ छेडीत,
क्षितीजावर इन्द्रधनू रंग उधळीत,
कोसळती शुभ्र प्रपात खाली,
हिरव्या गर्द कडा कपारी,
निसर्गाची ही किमया सारी.

अथांग दर्या दूर पसरतो, आभाळाला कवेत घेत,
अंगावर सोनेरी तरंग झेलीत,
खळखळती लाटा मध्यान्ह्काळी,
गडद निळ्या सागरकिनारी,
निसर्गाची ही किमया सारी.

ऊत्तुंग हिमालय उभा राहतो, आकाशाला हात टेकीत,
ऋषीतुल्य साधक जणू आशिष देत,
पसरती तयाची श्वेत सावली,
ऊंच सखोल दऱ्या गिरी-शिखरी,
निसर्गाची ही किमया सारी.

प्रखर रवि तेजात तळपतो, वसुंधरेचे रण पेटवीत,
चराचराचे जीवन उर्जीत,
उजळती दाही दिशा त्रिकाळी,
तप्त-तृप्त सहिष्णू धरा-अंबरी,
निसर्गाची ही किमया सारी.

..................आशिष जोशी

No comments: