Monday, September 28, 2009

चाकोरी-बाहेरचे जीवन

पहाटेचा मंद धुंद वारा,
प्राजक्ताचा पडला सडा,
पापण्यातील साखरझोप सारून तर बघा,
श्वास भरभरून तो सुवास घेऊन तर बघा.

श्रावणातली एक प्रसन्न सकाळ,
सभोवार पसरली दूरवर हिरवळ,
मस्त पडलेल्या धुक्यामध्ये जाऊन तर बघा,
अनवाणी पायाने दवबिंदूंवर चालून तर बघा.

उन्हाळ्यातल्या कडक दुपारी,
नभ अचानक येते भरूनी,
‘येरे येरे पावसा’ साद घालून तर बघा,
वळीवाच्या सरींत भिजत नाचून तर बघा.

हिवाळ्यातले शुभ्र चांदणे,
गुलाबी थंडीत लपेटलेले,
शेकोटीची उब अंगावर घेऊन तर बघा,
मित्रांसोबत रात्रभर गप्पा मारून तर बघा.

दिवसाची सुरुवात आगळी,
सुवर्णप्रभा नवतेज झळाळी,
न ठरविता ऑफिसला दांडी मारून तर बघा,
फक्त दोघं राजा-राणी मजा करून तर बघा.

सुट़्टीत विसावा संथ पहुडलेला,
घरी मुलांचा खेळ रंगलेला,
मुलांबरोबर साप-शिडी, लपा-छपी खेळून तर बघा,
चिमुकल्या नजरेतून ओसंडणारा आनंद साठवून तर बघा.

आयुष्यात दडले विलक्षण रंग,
मनात उठती असंख्य तरंग,
एकदातरी सगळ्यांचा आस्वाद घेऊन तर बघा,
थोडं चाकोरीबाहेर जाऊन मुक्त जगून तर बघा.

...............................आशिष जोशी

No comments: